काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक इच्छुकांच्या ३० जुलैला मुलाखती; जिल्ह्यातील ९ मतदारसंघातून ४७ इच्छुकांचे अर्ज

Foto
औरंगाबाद : लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लवकर निश्‍चित करण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून नुकतेच अर्ज मागवण्यात आले होते. या सर्व इच्छुकांच्या मुलाखती ३० जुलै रोजी शहागंज येथील गांधी भवन येथे होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी आज दै. सांजवार्ताशी बोलताना दिली.

 नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण, हा घोळ शेवटपर्यंत सुरूच होता. आ.सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सिल्‍लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारत राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आ.सुभाष झांबड यांचा दारुण पराभव झाला. एवढेच नव्हे तर त्यांचे डिपॉझिटसुद्धा जप्‍त झाले. आता काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अगोदरच उमेदवार निश्‍चित करण्याचीप्रक्रिया करून घेतली जात आहे. त्यानुसार पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांना २९ जून ते ५ जुलैपर्यंत अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील  ९ विधानसभा मतदारसंघातील ४७ इच्छुकांनी अर्ज नेले होते. आघाडीतील वाटाघाटीनुसार काँग्रेसच्या वाटेला औरंगाबाद पूर्व, पश्‍चिम, कन्‍नड, सिल्‍लोड, फुलंब्री हे मतदारसंघ येत असले तरी सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांकरिता चाचपणी करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी (३० जुलै) इच्छुुकांच्या मुलाखती पार पडणार असून, मुलाखती घेण्याकरिता मुंबई येथून सचिन सावंत तर पुणे येथून महिला आघाडीच्या सरचिटणीस कमल व्यवहारे येणार आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता शहागंजातील गांधी भवन येथे या मुलाखतीला प्रारंभ होणार असल्याचे पवार म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker